माणिक साळवे
औरंगाबाद: लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपा-शिवसेना युतीने मोठे यश संपादन केले. विधानसभेच्या निवडणुका दोन महिन्यावर आल्या आहेत. लोकसभा निवडणूक प्रसंगी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या चर्चेनंतर विधानसभा निवडणुकीसंबंधी ही बोलणी झाल्याचे बोलले जाते. पण आता प्रत्यक्षात मात्र सेना-भाजपात मुख्यमंत्री पदावरून पुन्हा एकदा वाक्युद्ध सुरू झाले आहे. या वाक्युद्धामुळे युती होणार की नाही, असा संभ्रम दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये होत आहे.
विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. त्या दृष्टीने सेना-भाजपाच्यावतीने तयारी सुरू केली आहे. पण लोकसभा निवडणूक प्रसंगी सेना-भाजपा युती होण्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली. त्यामुळे लोकसभेबरोबरच राज्याच्या मुख्यमंत्री पदाबाबत तसेच जागा वाटपावर ही चर्चा झाली असल्याचे बोलले जाते. तेव्हापासून शिवसेनेचे नेते आगामी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असे ठामपणे बोलू लागले. सेनेच्या काही नेत्यांकडून मुख्यमंत्री पदासाठी आदित्य ठाकरे यांचे नावही पुढे केले जाऊ लागले. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आगामी मुख्यमंत्री भाजपाचाच होणार असे ठामपणे सांगितले जाऊ लागले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सेनेच्या नेत्यांना समज देण्यचा प्रयत्न केला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या शेवटच्या अधिवेशन समारोप भाषणात पुन्हा मीच येणार असे वक्तव्य करून मुख्यमंत्री मीच होणार असल्याचे संकेत दिले. त्यानंतरही सेना मुख्यमंत्रीपदावरून इशारे देत आहे. पण तीन दिवसांपूर्वी मुंबई झालेल्या भाजपाच्या मेळाव्यात राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे.पी. लड्डा यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मीच मुख्यमंत्री होणार असल्याचे जाहीर केले. या मेळाव्यात काही नेत्यांनी सर्व २४८ जागा लढण्याची मागणी केली. भाजपाने ही सर्व जागांवर काम सुरू केलेले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत युती होणार की नाही. यावरून राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे. युतीतील नेत्यांमध्ये वाक्युद्ध सुरू आहे. यावरून सध्या युतीत तणाव निर्माण झाल्या आहे. एवढे मात्र खरे आहे.